'प्रेम' .......माणसाच्या जीवनातला सर्वात तरल भावनाविष्कार. ' प्रेम ' प्रत्येकजण आयुष्याच्या कोणत्या न कोणत्या वळणावर करतोच करतो. प्रेम म्हणजे वेदना, प्रेम म्हणजे दु:ख, अस सगळेच म्हणतात. तरी सगळेच जण प्रेम करतात. प्रेम हा त्या अर्थाने सार्वत्रिक स्वरूपाचा भावनाविष्कार आहे.
हृदयाच्या पायथ्याशी
वेदनेचा गाव आहे
जीव घेणाऱ्या वेदनेला
प्रेम असे नाव आहे
अस हे प्रेम जेव्हा एखाद्याला होत तेव्हा त्याच्यात अंतरबाह्य परिवर्तन होत, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोनच बदलून जातो. नेहमीच पाहतो ती फुले, संध्याकाळ, मावळतीचे सूर्यबिंब, चंद्र, चांदण्या त्याला अचानक वेगळ्या वाटायला लागतात. पूर्वी जी गाणी तो कानाने नुसती ऐकत असतो ती आता त्याच्या काळजात घुसू लागतात. अचानक ' तिच्या ' शिवाय किंवा ' त्याच्या ' शिवाय सर्व काही निरस वाटायला लागते. अगदी भर गर्दीत त्याला एकट एकट वाटायला लागत.......
तिच्या रंगात असा रंगलो
मी माझा राहिलोच नाही
तिचे स्वामित्व माझ्या अणू-रेणू वर
मी तिचा, बस दुसरी जाणीवच नाही
अशी त्याची स्थिती होते. आणि जेव्हा तो या प्रेमात एका विशिष्ट अशा पातळीवर येउन पोहचतो, अगदी पूर्णपणे त्या प्रेमाविष्कारात चिंब न्हाउन निघतो, त्याच्या हृदयातील भावनाउद्रेक पराकोटीला जावून पोहचतो, तेव्हा तो कविता करू लागतो.
त्याच अतिशय हळव झालेलं मन प्रत्येक गोष्टीकडे एका तरल काव्यात्म दृष्टीने पाहू लागत. मग तिचे डोळे ' झील ' किंवा ' मय के प्याले भरे हुए ' वाटायला लागतात. तिचे गळ्यात पडणारे हात ' चांदण्याचे हात ' वाटायला लागतात. ' फुले लाजरी ' बघून त्याला तिचे ' हळवे ओठ' स्मरतात. दारातल्या मोगर्याचा हवेवर स्वर होवून येणारा सुगंध त्याला तिच्या केसांचा सुगंधाची आठवण करून देतो. आणि तो एका वेगळ्याच कल्पनाविश्वात हरवून जातो.
आणि अशा नाजूक अवस्थेत जर विरह वाट्याला आला तर ......
त्या दर्द , त्याची वेदना असा आर्त हुंकार भरते कि आपसूक त्याची कविता बनते. " Poetry is a spontaneous overflow of powerful feeling's...!! " अस विल्यम वर्डस्वर्थ म्हणतो ते उगाच नव्हे !!
No comments:
Post a Comment